Thursday, May 28, 2020

व्हायरल पोष्ट,, प्रेरणादायी पण ,,ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!*

*
जवळच्या पैशातून तिनं एक जुनी, साधी सायकल विकत घेतली. मागं आपल्या आजारी वडलांना बसवलं आणि ती पॅडेल मारू लागली. लॉकडाऊनमुळे घरी जायला काहीच साधन उपलब्ध नसल्याने ज्योती पासवान या १५ वर्षाच्या मुलीनं सायकलवरून सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आज जग तिचं कौतुक करतंय. पण तिच्या प्रत्येक पॅडेलनं आपल्या समोर एक प्रश्न उभा केलाय. या लाखो प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आहेत?

कोरोना वायरसचा सामना करण्यासाठी सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन केला. पहिल्यांदा १५ दिवसांसाठी जाहीर केलेला लॉकडाऊन आणखी पंधरा, आणखी पंधरा दिवस असं म्हणत चार वेळा वाढला. देशातल्या वेगवेगळ्या शहरात पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थलांतरित झालेल्या मजुरांच्या राहण्याचा आणि जगण्याचा प्रश्न मात्र या लॉकडाऊनच्या काळात गंभीर बनला.
अचानक लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मजूर सैरभैर झाले. अशावेळी सरकारनं त्यांना आश्वस्त करायला हवं होतं. लॉकडाऊन संपेपर्यंत त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था पहायला हवी. पण सरकारने हात वर केले. धीर सुटलेल्या मजुरांचे तांडे जीवाच्या आकांताने रेल्वे रूळावरून, महामार्गावरून चालतच आपल्या घरी निघाले. हादरवून टाकणारं मजुरांचं हे स्थलांतर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून संपूर्ण देशात चाललंय.

आठ दिवसात बाराशे किमीचा प्रवास

या स्थलांतरितांमधे एक १५ वर्षांची मुलगी होती. हरयाणातल्या सिकंदरपूर भागात ती आणि तिचे वडील अडकले. त्यांना बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यातल्या आपल्या गावात जायचं होतं. सिकंदरपूर ते दरभंगा असं गुगलवर टाकलं तर कमीतकमी १३८८ किलोमीटरचं अंतर दाखवलं जातं. एवढा प्रवास तिने साध्या लेडीबर्ड सायकलवरून केला. तोही डबलसीट. आपल्या आजारी वडलांना मागे बसवून आठ दिवसांत तिनं हे अंतर कापलं.
कोरोना वायरस, लॉकडाऊन अशा संकटाच्या परिस्थितीतही हताश न होता तिने धैर्य दाखवलं. त्यामुळे ती सध्या चर्चेचा विषय बनलीय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका यांनीही सोशल मीडियावर तिच्या या कृतीचं ‘असामान्य धैर्याचे सुंदर प्रतिक’ म्हणून गौरव केलाय. २३ मेच्या ‘द इंडियन एक्सप्रेस’ या पेपरच्या पहिल्या पानावर तिचा आणि तिच्या वडलांसोबतचा फोटो छापून आलाय.

लॉकडाऊनमुळे भयानक कोंडी झाली

ज्योतीकुमारी पासवान असं तिचं नाव. वय वर्ष फक्त १५. वडलाचं नाव मोहन. बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यातलं सिरहुली हे त्यांचं गाव. आई-वडील भूमिहीन आहेत. पाच भावंडांमधे ज्योती दुसऱ्या नंबरची मुलगी. आता एवढ्या मोठ्या कुटुंबाचं पोट भरायचं म्हणजे पैसे जास्त लागणार. त्यासाठी ज्योतिच्या वडलांनी हरयाणातलं गुरूग्राम हे शहर गाठलं. संपूर्ण देशात हे शहर गुडगाव म्हणून प्रसिद्ध आहे. राजधानी दिल्लीशेजारचं हे शहर आयटी हब म्हणूनही ओळखलं जातं. तिथं ते रिक्षा चालवायचे. ज्योतीची आई अंगणवाडी सेविका आहे आणि उरलेल्या वेळात शेतमजूर म्हणूनही राबत असते.
लॉकडाऊनच्या आधी एका अपघातात ज्योतीच्या वडलांच्या गुडघ्याला दुखापत झाली. ज्योतीची आई १० दिवसांची सुट्टी काढून मुलांना घेऊन गुडगावला पोचली. बीबीसी हिंदीला दिलेल्या एका मुलाखतीत ज्योतीची आई फुलन देवी म्हणते, ‘६० हजार रूपये कर्ज काढून ज्योतिच्या बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं. पण अजूनही ते दुखापतीतून पूर्णपणे बरं होऊ शकले नाहीत. लॉकडाऊनमुळे उपचारही पुरेसे घेता आले नाहीत. मी अंगणवाडीत कामाला असल्यानं मला थांबता येत नव्हतं. म्हणून ज्योतीला वडलांकडे ठेऊन मी बाकी मुलांसोबत गावी परतले.’
वडील आजारी पडल्याने फेब्रुवारीपासून रोजची मिळकत थांबली होती. त्यातच सरकारने साथरोगाला रोखण्यासाठी लॉकडाऊन पुकारला. त्यामुळे ज्योती आणि तिच्या वडलांचं गुडगावला थांबणं आणखी कठीण बनलं.
‘लॉकडाऊनमुळे आमची भयानक कोंडी झाली होती. पैसे संपत आले होते. त्यात घरमालक भाड्याची मागणी करत होते. भाडं देत नसू तर घर मोकळं करायला सांगत होते. एका रात्री तर त्यांनी घराची वीजच तोडली. दोन रात्री आम्ही अंधारात काढल्या. मग मात्र तिथून निघण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याजवळ राहिला नाही,’ असं ज्योती सांगते.
गुडगावमधे मरण्यापेक्षा रस्त्यात मरू

तिच्याकडे जमवलेले काही पैसे होते. त्यातून एक जुनी सायकल घ्यायची आणि गावाला जायचं असं तिनं ठरवलं. सायकलची किंमत होती १२०० रूपये. पण सगळेच्या सगळे पैसे त्यांना दिले तर घरी जाऊन खायचं काय? ज्योतीनं सायकलच्या मालकाला ५०० रूपये दिले आणि बाकी रक्कम पुन्हा गुडगावला आल्यावर देईन, असं वचन दिलं. 
आपण निघायचंय हे ज्योतीनं वडलांना सांगितलं. पण एवढी पायपीट करायला वडील तयार नव्हते. गुडगावमधे मरण्यापेक्षा रस्त्यात मेलो तरी चालेल, असा निश्चयच ज्योतीने केला होता. तिनं जबरदस्तीने वडलांना मागे बसवलं आणि सायकलवर पॅडल मारणं सुरू केलं.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ज्योतीचे वडील मोहन मुलीबद्दल अभिमानाने सांगतात. ‘घरी जाण्याची तळमळ होती. पण कसं जायचं तेच समजत नव्हतं. सुखरूप जाता येईल अशी कोणतीच व्यवस्था दिसत नव्हती. प्रचंड निराश वाटत होतं. पण माझ्या मुलीने हार मानली नाही. मला माहीत नाही तिने हा विचार कसा केला. खरंच ती धीट आहे आणि मला तिचा गर्व वाटतो.’

लोकांच्या हसण्याने मला फरक पडत नाही

८ मेला ज्योतीनं प्रवास चालू केला. एकहाती सायकल चालवत आठ दिवसांनी ती गावात पोचली. तिच्यासाठी हा प्रवास किती खडतर होता याची कल्पना करणं संवेदना गोठवणारं आहे. वाटेत पलवल, आग्रा, मथुरा या आणि इतर ठिकाणी मुक्काम केला. अनेकांनी मदत केली. काही ठिकाणी जेवण मिळालं तर काही ठिकाणी बिस्किटं मिळाली. मिळालेली मदत आनंदाने घेऊन हा पल्ला पार केला.

ज्योती म्हणते, ‘बाप मागे बसलाय आणि मी सायकल चालवतेय हे दृश्य पाहून अनेकजण हसत होते. आपण मागे बसून मुलीला सायकल चालवायला लावतो म्हणून बापाला बोल लावत होते. वडलांना वाईट वाटायचं. ते मला सांगायचे. मला फक्त हसू यायचं. लोकांच्या हसण्याने मला फरक पडत नव्हता. वडलांचं दु:ख मला माहीत होतं.’


लाखो प्रश्न विचारत ती गावी पोचलीय

गावाला पोचल्यावर ज्योती आणि तिच्या वडलांना क्वारंटाईन करण्यात आलं. तिच्या जिगरबाज कर्तृत्वामुळे देशभरातून तिचं कौतुक केलं जातंय. भारतीय सायकल फेडरेशनच्या वतीने सायकल स्पर्धेत सहभाग घेण्याबाबतही तिला विचारणा करण्यात आलीय. तिला मदत करण्याची, तिला पुरस्कार देण्याची, तिचं कौतुक करण्याची आता स्पर्धाच सुरू होईल. पण खरंच तिच्या नजरेला नजर भिडवून तिचं कौतुक करण्याची सरकारची, राजकीय पुढाऱ्यांची नैतिक हिंमत होईल?
ज्योतीच्या साहसाचं आता कौतुक होतंय. पण आपण केलेल्या कृत्याचा तिला खरंच अभिमान वाटत असेल का? ज्योतीने १२०० किमी सायकलने प्रवास करण्याचं धैर्य हौस म्हणून दाखवलं होतं की हा जीवघेणा प्रवास करायला तिला भाग पाडलं गेलं? ज्योतीच्या प्रत्येक पॅडेलमागे या सरकारला विचारलेला एक प्रश्न आहे. असे लाखो प्रश्न विचारत ती तिच्या गावी पोचलीय.
ज्योती आठवीपर्यंतच शिकलीय. तिला पुढे शिकायची इच्छा आहे. पण आर्थिक परिस्थितीमुळे तिला पुढे शिकता येत नाही. अशा हजारो ज्योती, स्थलांतरित मजुरांची हजारो मुलं गावाच्या दिशेने महामार्गावरून, रेल्वे ट्रॅकवरून ऊर फुटेस्तोवर आईवडलांसोबत पळतायत. समृद्ध भारताचं हे बीभत्स रूप ज्योतीनं आठ दिवसांच्या प्रवासात ठिकठिकाणी पाहिलं असणार.
स्वतंत्र भारताला ७५ वर्ष झाली तरी हे जीवघेणे अनुभव लोक घेतायत. अशा लाखो ज्योती पासवान मनाने खचून गेल्या असतील. या देशात आपण असुरक्षित असल्याची भावना प्रबळ झाली तर त्याला जबाबदार कोण? 
*ज्योतीकुमारी पासवानचं तिच्या जिगरबाज साहसाबद्दल कौतुक करण्याऐवजी संपूर्ण देशानं खरंतर तिची माफी मागायला हवी. आपण हे करायला तयार आहोत?*

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...