Saturday, April 25, 2020

सोन्या सारख दातृत्व ,स्वत:च्या मालकीची जमीन २५ लाखांना विकून त्या दोघांनी हजारो गरिबांना केली मदत______वायरल मॅसेज_____________________________



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशामधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा केली. २५ मार्चपासून सुरु झालेला हा लॉकडाउन १४ एप्रिल रोजी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र या लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर कर्नाटकमधील कोलार येथील दोन भावांनी स्वत:च्या मालकीचा जमीनीचा तुकडा विकला. शहरामधील आपल्या मालकीची जमीन या भावांनी २५ लाखांना विकली. आता लॉकडाउनचा याच्याशी काय संबंध असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. तर लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या हातावर पोट असणाऱ्या कामगारांना मदत करण्यासाठी पैसे उभारण्याच्या दृष्टीने तजामुल आणि मुझमील पाशा या दोन भावांनी आपल्या मालकीचा जमीनीचा तुकडा विकला.
कोलारमधील हाऊसिंग बोर्ड कॉलिनीमध्ये राहणाऱ्या या दोन्ही भावांनी मिळालेल्या पैश्यामध्ये गरिबांसाठी किराणा माल आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची खरेदी केली आणि त्याचे वाटप सुरु केले. “कोरोना विरुद्ध लढायचे असेल तर आयसोलेशन महत्वाचे आहे. गरिबांना जेवायला अन्न मिळालं नाही तर ते रस्त्यावर भटकत राहणार. त्यामुळेच त्यांनी घरामध्येच रहावे असं वाटतं असेल तर त्यांना किराणा माल आणि अन्न त्यांच्या घरी पोहचवणे हा एकच पर्याय आहे,” असं तजामुल पाशा याने   बोलताना सांगितलं.जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यामध्ये असणाऱ्या मोहम्मदपूर गावाचे मूळ रहिवाशी असणाऱ्या या दोघा भावंडांवरील पालकांचे छत्र लहानपणीच हरवले. तजामुल आठ वर्षांचा असताना आणि मुझमील पाच वर्षांचा असताना त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं. नंतर ते त्यांच्या आजीबरोबर कोलारमध्ये स्थायिक झाले.
गरिबीमुळे त्यांना चौथीपर्यंतच शिकता आलं. पैसे कमवण्याची जबाबदारी लहानपणीच अंगावर पडल्याने त्यांना पुढील शिक्षण घेता आलं नाही. “एका मुस्लीम व्यक्तीने आम्हाला मशीदीजवळ रहायला घर दिलं. त्या काळात तेथील हिंदू, मुस्लीम आणि शीख कुटुंबांनी अन्न देऊन आमची भूक भागवली. तेथील लोकांमध्ये धर्म आणि जात कधीच आडवी आली नाही. मानवता आणि प्रेम मिळाल्यानेच आम्ही खडतर परिस्थीतीमधून इथपर्यंतचा प्रवास करु शकतो आणि आज आम्ही परतफेड करत आहोत. अशा परिस्थितीमधून आल्याने अन्नाची किंमत काय असते हे आम्हाला ठाऊक आहे. लहानपणी आलेल्या या अनुभवामुळेच आम्ही लॉकडाउन संपेपर्यंत गरिबांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं तजामुल सांगतो.
१४ हजार गरिबांना केली मदत -

जमीन विकून हातामध्ये २५ लाख रुपये आल्यानंतर पाशा बंधूंनी जवळच्या मित्रांना सोबत घेऊन एक पुरवठा साखळी तयार केली. यामध्ये सर्व धर्माच्या व्यक्तींचा समावेश आहे हे विशेष. मोठ्या प्रमाणात किराणा माल खरेदी करुन तो पाशा बंधूंनी त्यांच्या घरात साठवून ठेवला. त्यानंतर त्यांची त्याची पाकिटं तयार केली. एका पाकिटामध्ये १० किलो तांदूळ, एक किलो पीठ, दोन किलो गहू, एक किलो साखर, खाद्यतेल, चहा पावडर, मसाले, सॅनिटायझर, मास्क या गोष्टींचा समावेश त्यांनी केला. त्यानंतर उरलेल्या धान्याचा वापर करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या घराजवळच रिकाम्या जागेवर एक तंबू उभारला आणि त्यामध्ये कम्युनिटी किचन सुरु केले. ज्या लोकांना घरी जेवण बनवणं शक्य नाही त्यांना या माध्यमातून जेवण पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. पाशा बंधूंबरोबर काम करणाऱ्यांना काही स्वयंसेवकांना पोलिसांनी विशेष पास दिले आहेत. त्यामुळे एकाद्या ठिकाणी अत्यावश्यक वस्तू पोहचवण्यासाठी दुचाकीवरुन जाणे शक्य झालं आहे. गरिबाच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला जेवण मिळावे हे पाशा बंधूंचे मुख्य हेतू आहे.
आतापर्यंत पाशा बंधूंनी २ हजार ८०० कुटुंबांना किराणा मालाचं वाटप केलं आहे. याचा फायदा १२ हजार लोकांना झाला आहे. तर कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दोन हजार लोकांचे पोट त्यांनी भरलं आहे. आता पाशा बंधूंनी त्यांच्यासारखे काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना सोबत घेऊन हे काम सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे.
“सरकार लॉकडाउन वाढवेल याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही केलं. देवाच्या कृपेने आमच्याकडे जे होतं ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. लॉकडाउन संपेपर्यंत आम्ही ही मदत सुरु ठेवणार आहोत,” असं तजामुल सांगतो.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...